ठाणे, दि. १ : कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वयंशिस्त पाळून जिल्हा आणि राज्य कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल, सोनवणे, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाच्या संकटाविरोधात राज्याचं शासन, प्रशासन, संपूर्ण जनता आज एकजुटीनं लढत आहे, हे चित्र आश्वस्त करणारे आहे.
आपण लवकरच कोरोनाला हरविणार आहोत. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा अशी विनंती देखील श्री.शिंदे यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून ठाणे जिल्हावासियांना केली आहे.