वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Ahmednagarlive24
Published:

सातारा : पाटण तालुक्यात २९ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारासह सकल भागातील गावामधील घरांच्या तसेच शेडवरील पत्रे उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

त्याचबरोबर पिकांचे आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण प्रांताधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाला दिल्या.

वादळी पावसामुळे गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी तारळे परिसरातील नुकसान झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.

कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदीच्या काळात हैराण झालेल्या पाटण तालुक्यातील जनतेला २९ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठा फटका बसला. कोरोनाचे संकट असतानाही त्यांनी  तारळे परिसरात जावून घोट व मरळोशी या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महसूल, कृषी विभागाचे संबधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सुचनेवरुन पाटण तालुक्यातील महसूल व कृषी विभागाकडून तात्काळ वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून तालुक्यातील मेंढोशी, बिबी, धडामवाडी, म्हावशी, सुरुल,

पिपंळोशी, टोळेवाडी, नारळवाडी, आंब्रुळे, पापर्डे, मुरुड, घोट, ढोरोशी, मरळोशी, जंगलवाडी, धायटी, पाडळोशी, सडावाघापूर, काळोली, मुळगांव, येराड, नेरळे, कवरवाड, नेचल, गोषटवाडी, किल्लेमोरगिरी, सणबूर या गावांमध्ये व वाड्यावस्त्यांमध्ये घरांचे तसेच

चाफळ, पेठशिवापुर, किल्लेमोरगिरी, डोंगळेवाडी या गांवामध्ये पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागामार्फत प्रगतीपथावर सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment