श्रीरामपूरमध्ये खासदार पुत्राची बंडखोरी !

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :- शिवसेनेकडून इच्छुक असलेले खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, सेनेचा एबी फॉर्म भाऊसाहेब कांबळे यांना मिळाला आहे, तरीही लोखंडे समर्थक उमेदवारीबाबत आशावादी आहेत.

शिवसेनेचा एबी फॉर्म मिळालेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्याकडे एबी फॉर्म आहे. मात्र, शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव न आल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

एबी फॉर्म कांबळे यांना मिळालेला असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित आहे, असे सेनेचे पदाधिकारी डॉ. महेश क्षीरसागर यांनी सांगितले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करण्याचा विडाच ससाणे गटाने उचलला आहे.

ससाणे समर्थकांचा बुधवारी श्रीरामपूर मंगल कार्यालयात मेळावा झाला. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. एक-दोन दिवसांत ठोस भूमिका जाहीर करू, असे ससाणे यांनी जाहीर केले.

मेळाव्यास ज्येष्ठ नेते जी. के. बकाल, माजी सभापती नानासाहेब पवार, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. वंदना मुरकुटे, बाबासाहेब दिघे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, सुधीर नवले, मुरली राऊत, मुज्जफर शेख, मुख्तार शहा, भाऊसाहेब डोळस आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ससाणे गटाने अपक्ष उमेदवार उभा करावा, असे काहींनी सूचवले, तर काहींनी अपक्ष उमेदवार उभा केल्यास त्याचा फायदा कांबळे यांना होऊ शकतो म्हणून अपक्ष न लढता एखाद्या पक्षातून उमेदवार उभा करावा किंवा एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे सांगितले.

तालुक्यात बाह्यशक्तींचा हस्तक्षेप होऊ देऊ नये. सर्व परिस्थितीचा विचार करून ससाणे यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशा भावना व्यक्त झाल्या. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपुरात येऊन काही निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

त्यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, रवी डोळस, रामचंद्र जाधव यांची अपक्ष म्हणून नावे सूचवण्यात आल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.

भाऊसाहेब पगारे यांनी मनसेमध्ये प्रवेश केल्याने श्रीरामपूरमध्ये मनसेचाही उमेदवार लढतीत असण्याची शक्यता आहे. पगारे यांनी एमआयएम व एक अपक्ष असे दोन, तर अशोक बागूल यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment