वकील संभाजी ताके खूनप्रकरणी ४ आरोपींना अटक

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- जेऊर हैबती येथील वकील संभाजी ताके खूनप्रकरणी नेवासे पोलिसांनी सर्व चारही आरोपींना अटक केली. शरद शिवाजी ताके, शिवाजी राजाराम ताके, मंदा शिवाजी ताके व सोनल शरद ताके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.शरद यास गुरुवारी, तर शिवाजी, मंदा, सोनल यांना शुक्रवारी नेवासे न्यायालयात हजर केले असता या सर्व आरोपींना येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

या खूनप्रकरणातील गंभीर जखमी रवींद्र शंकर गोसावी (सावेडी, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शरद व त्याची पत्नी सोनल, शिवाजी व त्याची पत्नी मंदा यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला. फिर्यादीत गोसावी याने नमूद केले आहे की, अ‍ॅड. संभाजी ताके हे माझे मित्र होते. त्यांनी मला २ ऑक्टोबरला त्यांच्या जेऊर हैबती येथील शेतात नेले होते.

दुसरे मित्र अशोक शिंदे (नगर) यांच्या चारचाकी वाहनात बसून आम्ही जेऊरकडे जात असताना नेवासे फाट्यावर संतोष घुणे यास सोबत घेतले. जेऊर हैबतीत ताके वस्तीवर अ‍ॅड.ताके यांचे शेत बघून परत दुपारी एकच्या सुमारास निघालो असता शेताजवळच्या रस्त्यावर शिवाजी राजाराम ताके दिसल्यानंतर शिवाजीने अ‍ॅड . संभाजी यांना शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी मी व अशोक शिंदे याने शिवाजीस भांडण करू नका, आपण एकत्र बसून वाद मिटवून घेऊ, असे सांगितले.

त्यानंतर आम्ही एकत्रितपणे वाहनाकडे जात असतानाच शिवाजी हातात कुऱ्हाड घेऊन मागे आला. त्यानंतर शिवाजी व संभाजीत बाचाबाची झाली. मंदा व सोनल याही तेथे आल्या. सोनलने अ‍ॅड. संभाजीच्या डोळ्यावर व अंगावर मिरची पावडर फेकली. त्यानंतर आम्ही सर्व जण वाहनात बसून निघालो असतानाच समोरून आलेल्या शरदने आमच्या वाहनास दुचाकी आडवी लावत माझ्यावर वार केला. तो मी झेलला. मात्र, डोक्यास लागले. शरदने मित्र शिंदे याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला.तसेच आरोपींनी केलेल्या मारहाणीत अ‍ॅड. संभाजी राजाराम ताके व संतोष सुंदरराव घुणे (बहिरवाडी, ता. नेवासे) हे दोघे मरण पावल्याचे समजले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment