शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून वापरला गेलेला कास्ट पॉलिटिक्सचा फॉर्म्यूला राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही गवसल्याने विधानसभा निवडणूकीत रंगत वाढली आहे. सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक घुले बंधूंच्या रणनितीमुळे अटीतटीची बनली आहे.
भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून ऍड. प्रताप ढाकणे यांना निवडणूक रिंगणात उतरून घुले बंधूंनी 1999 साली स्वर्गीय मारुतराव घुले यांनी वापरलेल्या राजकीय सोंगट्या पुन्हा बाहेर काढल्या आहेत.

1999 साली स्वर्गीय घुले यांनी नेवासा- शेवगाव मतदारसंघात राजकीय अडसर ठरलेल्या तुकाराम गडाखांना बाजूला करण्यासाठी पांडुरंग अभंग यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. शेवगाव- पाथर्डी मतदार संघात याच घटनेची पुनरावृत्ती करण्याचा घाट घुुले बंधूंनी घातला आहे.
मोनिका राजळेंना हटविण्यासाठी ढाकणे यांच्या मागे त्यांनी आपली शक्तीपणाला लावली आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात वंजारी व मराठा समाजाचे प्रामुख्याने प्राबल्य आहे.
मतदारसंघातील ओबीसी समाजावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. फक्त ओबीसींच्या जीवावर सत्ता स्थापने शक्य होत नसल्याने ना. पंकजा मुंडे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोनिका राजळे यांचा मराठा चेहरा पुढे करून ओबीसींची ताकद त्यांच्या मागे उभी केली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रशेखर घुले यांचा भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्याकडून सुमारे 53 हजार मतांनी पराभव झाला.कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेहमीच बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघाला ना.मुंडेंनी वापरलेल्या कास्ट पॉलिटिक्स फॉर्म्युल्याची मात्रा चांगलीच लागू पडली. याच फॉर्मुल्यामुळे मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला.
याही निवडणुकीत भाजपने आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरून विरोधकांपुढे आव्हान उभे केले आहे. माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले शेवटच्या क्षणापर्यंत शांत होते.
भाजपची उमेदवारी घेऊन रिंगणात उतरलेल्या राजळेंना शह देणे घुले बंधूसाठी मोठे आवाहन होते. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी घुले बंधूंनी भाजपने वापरलेला कास्ट पॉलिटिक्सचा फॉर्म्युला शोधला.
स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी 1999 ला घेतलेल्या भूमिकेची पुन्हा पुनरावृत्ती करून निवडणुकीतून माघार घेतली. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे या वंजारी समाजाच्या चेहऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन मराठा समाजाची शक्ती त्यांच्यामागे उभे करण्याचा घेतला.
घुले बंधूंच्या या धक्कातंत्राच्या निर्णयाने शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची व अनिश्चितता निर्माण करणारी बनली आहे.
- MPSC Pashudhan Vikas Adhikari Jobs 2025: तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करा! MPSC द्वारे पशुधन विकास अधिकारी पदासाठी तब्बल २७९५ जागांची भरती सुरू
- कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली हे करणे सोपे नव्हते मात्र आपण ते करून दाखवले – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
- शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील ८३ तलाव होणार गाळमुक्त – आ. मोनिका राजळे
- लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी ! 2100 रुपयांचा हफ्ता कधीच मिळणार नाही ? सरकारमधील मंत्र्यांच्या विधानाने चर्चा
- ऊस आणि चारा पिके करपली, मुळाच्या पात्रात तातडीने पाणी सोडा ! शेतकऱ्यांची मागणी