सिमांत, लहान शेतकऱ्यांना मूळगावी आणण्यासाठी पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Ahmednagarlive24
Published:

यवतमाळ, दि.8 : जिल्ह्यात सिंचनाची सोय नसल्यामुळे खरीप हंगाम आटोपताच बहुतांश शेतकरी रोजमजुरीकरीता मोठ्या शहरात स्थलांतर करतात.

लॉकडाऊनमुळे हे शेतकरी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम त्यांच्या हातून जाऊ शकतो.

त्यामुळे जिल्ह्यातील सिमांत व लहान शेतकऱ्यांना (2 हेक्टरच्या आत शेती असलेले) मूळगावी परत आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही मुख्यत: कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू स्वरुपाची असल्यामुळे अनेक सिमांत व लहान शेतकरी मान्सूनवर आधारीत खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर अशी पारंपरिक पिके घेतात.

खरीप हंगाम आटोपल्यानंतर सिंचनाची सोय नसल्यामुळे शेतीमध्ये कोणतेही पीक त्यांना घेता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने जानेवारी ते एप्रिल या तीन-चार महिन्यांच्या कालावधीत ते उदरनिर्वाहाकरिता परराज्यात किंवा इतर मोठ्या शहरात स्थलांतर करतात.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सद्यस्थितीत जवळपास दीड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. जिल्ह्यातील अनेक सिमांत व लहान शेतकरी परराज्यात व मोठ्या शहरात अडकले आहेत.

हे शेतकरी जर आता 10 ते 15 दिवसांमध्ये त्यांच्या मूळगावी परत येऊ शकले नाही तर खरीप हंगामापूर्वी शेतजमिनीची मशागत करणे व खरीपाची पेरणी करणे त्यांना शक्य होणार नाही.

त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होऊन ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील बाहेरगावी असलेल्या सर्व सिमांत व लहान शेतकऱ्यांना त्यांच्या मूळगावी परत आणावे, या सदंर्भात पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

तसेच परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने निदर्शनास आणून दिला. यावर योग्य कारवाई करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment