पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा

Ahmednagarlive24
Published:

भंडारा, दि.८ :- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी  प्रभावी उपाय योजना राबवून जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई भासणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

जिल्हा परिषद, नगरपरिषद व नगरपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली  पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

खासदार सुनिल मेंढे, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यावेळी उपस्थित होते.

उन्हाळ्यास प्रारंभ झाला  असून उन्हाळ्याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील लोकांना बसते. ग्रामीण भागातील लोकांना पाणी मिळाले पाहिजे.

पाणीटंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील नळ योजना व विंधन विहिर नादुरुस्त असल्यास  सर्वेक्षणाच्या कामास प्राधान्य देऊन तात्काळ दुरुस्त कराव्यात.

जूनपर्यंत सर्व कामे झाली पाहिजे, त्यानुसार कामाचे नियोजन करावे. या कामाचे मॉनिटरिंग मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करून कामावर जातीने लक्ष देऊन कामास गती द्यावी, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

ग्रामीण भागातील नळ योजना व विहिर दुरुस्तीचे सर्व प्रस्ताव ताबडतोब शासनाकडे सादर करावे, मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

प्रादेशिक नळ योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असल्याचे खासदार सुनिल मेंढे व आमदार राजु कारेमोरे यांनी निदर्शनास आणून दिले. सदर प्रस्ताव तात्काळ सादर करा, अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी  दिल्या.

जिल्ह्यातील जीवन प्राधिकरणाकडे असलेल्या चारही नळ योजनेचा अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितले. नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात पाणीटंचाई भासू नये यासाठी टँकरची व्यवस्था करावी.

जिल्हा परिषद अंतर्गत नळ योजनेच्या प्रस्तावासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घेऊन  पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे, असे ते म्हणाले.

अनेक गावात हातपंपाद्वारे फ्लोराईडयुक्त पाणी येते,  शुध्द पाणी येत नाही, त्या नादुरुस्त आहेत अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यामुळे हत्तीरोगासारखा आजार होण्याचा धोकाही संभवतो.

पाणीटंचाईबाबत गंभीर राहा, जीवन प्राधिकरणाने सर्व तपासणी करुन अहवाल सादर करावा तसेच गावनिहाय अद्ययावत माहिती सादर करण्यास त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी सुधीर गवळी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये भंडारा, पवनी, साकोली, तुमसर नगरपरिषद व लाखनी, मोहाडी, लाखांदूर नगरपंचायतीचा आढावा सादर करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment