स्वगृही परतणाऱ्या नागरिकांची तपासणी मोफत – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि. 8 – लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे, अमरावती विभागात अडकलेल्या बिहार राज्यातील मजूरांसाठी विशेष रेल्वे अमरावती रेल्वे स्थानकावरून १० मे रोजी रवाना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुषंगाने सोशल डिस्टन्स, पार्किंग, भोजन, पाणी आदी व्यवस्था काटेकोरपणे करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अडकलेल्या प्रवासी नागरिक, कामगार बांधव यांना स्वगृही परतण्यासाठी परवानगी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून याबाबत सतत आढावा घेतला जात आहे. अद्यापपर्यंत साडेचार हजारांहून अधिक नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यातील अनेक नागरिक स्वगृही परतले आहेत.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात अडकलेल्या बिहार, झारखंड येथील नागरिकांसाठी स्वतंत्र रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. त्यानुषंगाने काटेकोर नियोजन करावे. सोशल डिस्टन्स पाळणे खूप आवश्यक आहे.

मोठ्या प्रमाणात मजूर, प्रवासी येतील. त्यासाठी स्थानकावर जेवण, पेयजल आदी व्यवस्था असावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

त्या म्हणाल्या, प्रवास करु इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांची प्रवास सुरु होण्यापुर्वी डिजीटल थर्मामीटरच्या सहाय्याने तपासणी आणि सिम्टोमॅटीक एक्झामीनेशन (रोगलक्षणात्मक तपासणी) होणे गरजेचे आहे.

शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ही वैद्यकीय तपासणी पूर्णत: मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यानुसार अमरावती रेल्वेस्थानकावर चाचणीसाठी वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध ठेवाव्यात.

शासनाच्या निर्णयानुसार तपासणी करण्यात आलेल्या आणि एन्फ्लुएन्जासारखा कोणताही आजार न दर्शविणाऱ्या व्यक्तिंची एकत्रीत यादी प्रमाणीत करुन वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जारी करण्यात येणार आहे.

त्यामुळे आता प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. या यादीतील व्यक्ती प्रवास करु शकतील, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांसाठी मोठी सुविधा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, व्यापार- उद्योगांना चालना मिळण्यासाठी संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता आणून जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा, दुकाने, व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, या कालावधीत मास्क, सोशल डिस्टन्स आदी बाबींचे काटेकोर पालन झालेच पाहिजे. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी दर शनिवारी दुपारी तीन ते सोमवारी सकाळी सातपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीत दुकानांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेणे दुकानदारांना बंधनकारक केले आहे. याबाबत तपासण्यांचे आदेशही विविध यंत्रणांच्या पथकांना देण्यात आले आहेत.

आता जबाबदारी आणखी वाढली

कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. लॉक डाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपलेले नाही.

उलट या काळात आपली सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. मुख्यत्वे घराबाहेर पडताना मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, विविध यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत.

त्यांना सर्वांनी सहकार्य करावे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी या काळात सर्वांनी एकजूट होऊन सर्व दक्षता नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment