संगमनेर :- आज प्रदेशाध्यक्ष कोठे दिसत नाही, असे विचारणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी साडेचार वर्षे, जर प्रामाणिकपणे काम केले असते, तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. लोकसभा निवडणुकीत आमदार भाऊसाहेब कांबळेंसाठी मी रात्रीचा दिवस केला. मात्र, तो गडी तिकडे गेला. सरड्याला हरवणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे लोक आता राज्यात दिसायला लागलेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी केली.
श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे आयोजित संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर येथील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभावेळी थोरात बोलत होते. श्रीरामपूरचे उमेदवार लहू कानडे, शिर्डीचे उमेदवार सुरेश थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, युवकचे सत्यजित तांबे, कांचन थोरात, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, शरयू थोरात, डॉ. जयश्री थोरात, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हाध्यक्ष करण ससाणे, हेमंत ओगले, उत्कर्षा रुपवते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अरुण कडू, बाजीराव खेमनर, रणजित देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना एकटे सोडून पळून न जाता बाजीप्रभूंनी केवळ शिवाजी महाराजांचेच प्राण वाचवले नाही, तर स्वराज्यदेखील वाचवले. मीदेखील पक्षाच्या अडचणीच्या काळात इतरांसारखे पळून न जाता बाजीप्रभूप्रमाणे काम करतोय, असा टोला पक्षांतर करत टीका करणाऱ्यांना थोरात यांनी लगावला. संगमनेरातील माझ्या विरोधकांना मी नेहमी सहकार्य केले, असे सांगून थोरात म्हणाले, युतीचे सरकार अपयशी सरकार आहे.
शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यांना लाइनमध्ये उभे केले. खासगी कंपन्यांना चाळीस हजार कोटींचा फायदा झाला. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी मोर्चा काढला, तो मोर्चा जहाजाचा विमा उतरवणाऱ्या कंपनीवर नेला. काश्मीरच्या निवडणुकीत हे महाराष्ट्राचे बोलतील का? निवडणुकीत हे आता काहीतरी नवीन पिल्लू शोधून काढतील. १९९९ मध्ये काँग्रेस फुटली त्यावेळी राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.
त्यावेळी आम्ही तत्त्वासाठी काँग्रेसमध्ये राहिलो. आता हे सर्वजण कुठे आहे हे तपासण्याची वेळ आली आहे. काँग्रेस उठली की ती दणकून उठते, हा इतिहास आहे. यावेळीदेखील याचीच पुनरावृत्ती होणार असून आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. नगर जिल्ह्यात बारा शून्य नाही, तर शून्य बारादेखील होऊ शकते, असे थोरात म्हणाले.
- भारतात आढळतो किंग कोब्रापेक्षाही विषारी साप ! ‘या’ सापाच्या दंशाने व्यक्ती वाचली तरी पॅरालिसीस होऊ शकतो
- पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर
- इंजिनिअर बनायचंय ? मग सिव्हिल, मेकॅनिकल सोडा ‘या’ ब्रांचमधून इंजिनिअरिंग करा, लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीं मिळणार
- पुण्यातील दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा नवा मार्ग तयार होणार ! ‘या’ भागात विकसित होणार 20 किलोमीटर लांबीचा बोगदा