राधाकृष्ण विखेंना हरविण्यासाठी आ.बाळासाहेब थोरात आक्रमक

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी :- विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी थोरात गटाने व्यूहरचना आखली आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे शिर्डी विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार असतील असे संकेत युवा नेते सत्यजित तांबे यांनी दिल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी मंत्री विखे यांनी संगमनेर मतदार संघात विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे थोरात हेही आता शिर्डीत आक्रमक झाले आहेत. राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात कोण राहील? हा प्रश्न निर्माण झाला होता.

सुरुवातीला सत्यजित तांबे, नंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांची नावे चर्चेत होती. आता सुधीर तांबे यांचे नाव पुढे आले आहे. मंत्रीपद टिकविण्यासाठी राधाकृष्ण विखे यांनी आपला शिर्डी मतदार संघ सुरक्षित ठेवून जिल्ह्यात ‘बारा विरुध्द शून्य’ असा निकाल देण्याचे ठरविले आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन आपला संगमनेर मतदार संघ सुरक्षित ठेवून आमदार बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्रासाठी वेळ द्यायचा आहे. संगमनेर मतदार संघात थोरात यांना खिळवून ठेवण्याची तयारी विखे यांनी आधीपासून सुरू केली आहे.

त्यासाठी सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. प्रसंगी विखे कुटुंबातील 1 सदस्य संगमनेरमध्ये उमेदवारी करु शकतो, असे संकेत विखे गटाने यापूर्वीच दिले आहेत. थोरात – विखे यांनी कंबर कसल्यास शिर्डी, संगमनेर मतदार संघातील लढती रंगतदार होतील, अशी चिन्हे आहेत.

‘निवडणूक विधानसभेची, सव्वा लाखांच्या मताधिक्याची’ ही टॅगलाईन घेऊन विखे यांनी मतदार संघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली. खासदार सुजय विखे यांनीही पदाधिकाऱ्यांसमवेत गावनिहाय चर्चा करुन कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

विखे यांचा संगमनेरातील हस्तक्षेप रोखण्यासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना विखे यांच्या विरोधात मैदानात उतरविण्याचा पर्याय पुढे आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment