कर्जत :- विधानसभा निवडणुका जाहिर होण्या आगोदरच कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांचा वावर जास्त वाढल्याने मतदारसंघ अधिक चर्चेत आलाय . आता तर राज्यातील वजनदार पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात पवार घराण्याने दंड थोपटल्यामुऴे हा मतदारसंघ अधिक हॉट झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी दहा वर्षात स्वत:ची अशी स्वतंत्र यंत्रणाच उभी केली नसल्याने त्यांची मदार आता खा. सुजय विखे यांच्या यंत्रणेवरच अवलंबुन आहे. परंतु रोहित पवार यांची यंत्रणा गेली एक वर्षांपासुन राबत असुन त्यांनी पक्षातील नेते सोडुन जनतेपर्यंत सतत संपर्कात असल्याने विखे यांची यंत्रणा सुध्दा आता त्या पुढे फिकी दिसत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्याची परिस्थिती पहाता राम शिंदे यांना ही निवडणुक खुपच जड जाणार असल्याचे जाणवत आहे. यातुनही जर काही चमत्कार झाला तर तो सुजय विखे यांनाच करावा लागणार आहे. जर पालकमंत्री निवडुन आले तर त्यात सिंहाचा वाटा हा विखे यांचाच असणार आहे.
कर्जत जामखेड हा तसा दुष्काळी मतदारसंघ येथील सर्वच प्रश्न पाण्याशी निगडीतच पण आज पर्यंत कोणीच या मतदारसंघात लक्ष दिले नाही. सर्व निवडणुका या एकमेकांची जिरवण्यातच होत होत्त्या यामुळे फक्त पाणी प्रश्नावर भावनीक अवाहन केले की मतदार भुलत होते. . उमेदवारही फक्त गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना हाताशी धरुन राजकारण खेळत असत. मतदारांकडे कोणी ढुंकुनही पहात नसे. गेल्या लोकसभेवेळीही सुजय विखे यांनी मतदारसंघात तीन वर्षांपासुन वावर ठेवला होता. आरोग्य शिबिरे यांच्या माध्यमातुन त्यांनी थेट जनतेशी संपर्क ठेवला. पक्ष कोणताही असो पण आपण निवडणुक लढवणारच असा त्यांनी हेका धरला. परंतु त्यांना कॉंग्रेस राष्ट्रवादीची साथ त्या वेळी होती . नंतर त्यांना भाजपाची उमेदवारी मिळाल्याने काही लोक नाराज झाले परंतु भाजपा सेनेचा एक गठ्ठा त्यांना मिळाल्याने व मोदी लाट असल्याने फायदा झाला.
रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात लक्ष घातल्याने त्यांना मताधिक्य कमी मिळाले. राम शिंदे यांनी मतदार संघात जोर लावुन विखे यांचे काम केले परंतु त्या वेळीही जातीयवादी राजकारण होऊन विखे यांचे मताधिक्य कमी झाले. विखे यांना जी मते मिळाली त्यात ओबीसी मतांचा सिंहाचा वाटा होता. विखे यांचा तालुक्यात जो गट आहे त्यातील मराठी सरदारांच्या पठीमागील मते विखे यांना मिळाली असल्याचा संशय आहे. परंतु जनतेशी संपर्क काय असतो हे विखे यांनी दाखवुन दिले. तर रोहित पवारांनीही त्याचीच रि ओढत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातील पुढा-यांना सोडुन थेठ जनतेचे प्रश्न समजावुन घेत त्यांना मदत करण्याचा सपाटा लावला.
बारामती अॅग्रोच्या माध्यमातुन त्यांनी पाण्याचे टॅंकर सुरु करुन थेट वाडी वस्ती घरी पाणी पुरवठा केला. तसेच आरोग्य शिबिरे, मनोरंजनाचे कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा , महीलांना व शेतक-यांना बातामतीचा विकास दाखवुन सहली केल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पॅड व विद्यार्थ्यीनींना सॅनेटरी नॅपकीन वाटुन थेट घरातील अवालवृध्दांच्या तोंडी रोहीत पवार हे नाव पोहचवुन आपली ओळख निर्माण केली. राम शिंदे यांच्या पेक्षाही रोहीत पवार यांची ओळख जास्त निर्माण झाल्याने आता विखे यांना सुध्दा भविष्यात रोहीत पवार या वादळाचा सामना करणे कठीण होणार आहे.
मतदार संघात विकासाची भाषा पालकमंत्री राम शिंदे हे जेंव्हा आमदार होते तेंव्हा त्यांचा संपर्क हा चांगला होता परंतु ते जेंव्हा मंत्री झाले तेंव्हा मात्र त्यांची जनतेशी असणारी नाळ तुटली आणि त्यांचा संपर्क हा फक्त ठेकेदार व प्रत्येक गावातील त्यांचे बगलबच्चे यांच्याशी वाढला. पालकमंत्र्यांनी मतदार संघात जलयुक्त शिवार, तुकाई चारी , रस्ते , मिरजगाव , कर्जत बसस्थानक या साठी निधि आणला. मतदारसंघात विकासच केला असे नाही परंतु तो विकास दिसला नाही. भ्रष्टाचा-यांची टोळीच त्यांच्या जवळ जास्त असल्याने त्यांना विकास दाखवता आला नाही. पालकमंत्र्यांनी प्रत्येक गावात किती किती निधि दिला ही कोटीची कोटी उड्डाने फलकावर दिसत होती मात्र विकास दिसत नव्हता. तो न दिसण्यास कारण म्हणजे स्थानिक पुढा-यांनी सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवला नाही.
पालकमंत्री प्रत्यक्ष संपर्क ठेऊ शकत नसले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना जवळ केले नाही. फक्त फायदा करुन घेण्यासाठी हे लोक त्यांच्या जवळ होते . जे त्यांच्या जवळ होते होते आज ते त्यांच्याच विरोधात आहेत त्यात ठेकेदारांचा भरणा जास्त आहे. ज्या कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या साठी काम केले त्यांच्या कडे शिंदे यांनी कधी ढुंकुनही पाहीले नाही त्यामुळे दिलीप गांधीवर जशी पक्षातील लोकांची नाराजी होती तशी पालकमंत्री व त्यांच्या बगलबच्चांवर आहे. ही नाराजी कशी दुर होते यावरच त्यांचे भवितव्य अवलंबुन आहे.
एकंदरीत राम शिंदे हे सध्या अडचणीत असले तरी जर मराठा उमेदवार म्हणुन रोहीत पवार यांना मतदान करा असा प्रचार झाला तर ओबीसी व इतर समाज हा त्या विरोधात मतदान करू शकतो.. हे लोकसभेच्या निवडणुकीत व या पुर्वीच्या निवडणुकांमध्ये दिसुन आले आहे. परंतु रोहीत पवार यांनी मात्र सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेत प्रचारत आघाडी घेतली असली तरी अंतीम टप्प्यात जर राष्ट्रवादीच्या पुढा-यांकडुन जातीवर प्रचार करण्याची घोड चुक झाली तर त्याचा तोटा निश्चितच पवार यांना होईल. पवार यांचा जो मौखीक प्रचार चालु आहे तेवढा भाजपाचे कार्यकर्ते हित चिंतक करताना दिसत नसल्याने राम शिंदे यांचे भवितव्य अंधारात दिसत आहे.
- कृष्णा गोदावरी खोऱ्याकरिता स्थापन करण्यात येणार निवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- वापरा ‘हा’ फॉर्म्युला आणि PPF योजनेत पैसे गुंतवा! मिळेल लाखो करोडोत परतावा
- कमी पगारात देखील पैसे वाचवा आणि वाढवा! ‘या’ टिप्स फॉलो करा,होईल फायदा
- भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर देईल प्रचंड पैसा! मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने जारी केला रिपोर्ट
- लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत