संगमनेर बसस्थानकाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा !

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- नव्याने उभ्या रहात असलेल्या बसस्थानकामुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली बसस्थानकाच्या ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावरील बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला.

ठेकेदाराने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवत वाळूतस्करांकडील वाळू या कामासाठी वापरल्याचा आरोप सामाजिक युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केला.

खताळ यांनी पत्रकारांना यासंदर्भात दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, बसस्थानक व तेथील व्यापारी संकुलाचे काम करणाऱ्या आर. एम. कातोरे या ठेकेदाराने ५९०० चौरस मीटरचे बांधकाम करताना महसूल विभागाकडील गौण खनिजाची कुठलीही परवानगी न घेता वाळूसाठीचा खाणपट्टा आरक्षित न करता वाळूतस्करांकडून वाळू घेत बांधकाम केले.

विशेष म्हणजे गत काही वर्षात संगमनेर बसस्थानकाच्या परिसरापासून पन्नास किलोमीटर अंतरात शासनाकडून वाळूचे लिलावदेखील झालेले नाहीत. साठ हजार स्क्वेअर फूट बांधकामासाठी अंदाजे १० हजार ब्रास वाळूचा वापर झाला आहे. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ठेकेदाराने रॉयल्टी भरण्याचे मान्य केले.

मात्र, गौण खनिज अधिनियमातील तरतुदीप्रमाणे ठेकेदारावर रॉयल्टी आणि दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे. बीओटी तत्त्वावर नाशिक-पुणे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीवर गौणखनिजाचा अवैध वापर केल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाई होते.

मात्र, बसस्थानकाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर महसूलचे अधिकारी दंडात्मक कारवाई कधी करणार, असा सवाल खताळ यांनी उपस्थित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment