संगमनेर :- तालुक्यातील एका इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसचालकाकडून बेदरकारपणे वाहन चालवल्याने बसचा अपघात होऊन नऊ शाळकरी मुलांसह दोन जण जखमी झाल्याची घटना येथील रणखांब शिवारातील रस्त्यावर घडली.
तालुक्यातील गुंजाळवाडी पठार भागातील वृंदावन इंग्लिश मीडिअम शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी असलेली बस (एम एच १७ बीडी २०६६) घेऊन चालक गोरक्ष कैलास साळुंखे (वय २६ रा. साकूर, ता. संगमनेर) हा दि. २८ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास रणखांब शिवारातून रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता भरधाव वेगाने जात असताना गाडीचा ताबा सुटून बस रस्त्याच्या खाली पडली.
या अपघातात वय वर्ष ४ ते १० असलेली नऊ शाळकरी मुले जखमी झाली त्याचबरोबर बसचालक व मुले वाहणारा (केअर टेकर) अशी दोघे जण जखमी झाले आहेत. याबाबत शाळेच्या वाहतूक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घारगाव पोलिस ठाण्यात बसचालक गोरक्ष साळुंखे याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.