पाण्यासाठी संघर्ष करणार : आमदार नीलेश लंके

Published on -

पारनेर :- कान्हूरपठार व पठार भागावरील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करून रस्त्यावर उतरू आणि तरीही हा प्रश्न सुटला नाही तर सरकारशी दोन हात करू, पण आगामी काळात हा पाणीप्रश्न सोडवूच, अशी ग्वाही तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांनी दिली. कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे मंगळवारी झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदश्य विलास व्यवहारे होते.

आ. लंके यांनी सांगितले की, आगामी काळात पठार भागासह पारनेर तालुक्याची लढाई ही पाणीप्रश्नासाठी असेल. पठार भागावरील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठीदेखील प्रयत्न करणार असून, वेळप्रसंगी पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मी सर्वसामान्य परिवारातील असल्याने या भागातील महिलांना उन्हाळ्यात किती संघर्ष करावा लागतो, याची जाणीव मला आहे. नजीकच्या काळात महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

आपण जनतेचे आमदार नसून सेवक असल्याचेही ते म्हणाले. वीस किलोमीटर अंतरातील भुमिपुपुत्रांना टोलमाफ झालाच पाहिजे, अशी भूमिका मांडत कान्हूरपठार ते किन्ही रस्त्याचे काम मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे म्हणाले, आगामी काळात ज़नतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार लंके यांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe