चंद्रपूर, दि. 14 : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुदैवाने कोरोना आजाराचा अधिक प्रादुर्भाव नाही. त्या दृष्टीने आपले नियोजनही उत्तम आहे.मात्र सध्या मोठ्या प्रमाणात मजूर, कामगार, विद्यार्थी यांचे रेड झोन मधून येणे-जाणे होत आहे.
त्यामुळे अधिक काळजी घ्यावी. जिल्हा कोरोना मुक्त राहील अशा प्रकारचे आपले नियोजन असावे, अशी सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज येथे केली.
चंद्रपूर येथे जिल्हा नियोजन भवनात प्रमुख अधिकाऱ्यांची आज त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,
महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे तसेच आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. कोरोना प्रादुर्भाव सुरुवात झाल्यापासून प्रत्येक बाहेरून आलेल्या नागरिकांचे गृह अलगीकरण करणे,
त्यांची नोंद घेणे, तसेच आरोग्य पथक यांच्यामार्फत वारंवार प्रत्येक घराची चौकशी करणे, तसेच आधुनिक संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून प्रशासन व सामान्य नागरिक यांच्यामध्ये समन्वय ठेवल्यामुळे मोठ्याप्रमाणात तपासणी व रुग्णांची माहिती गोळा करता आली.
त्यामुळे नेमकेपणाने जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविता आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरणही करण्यात आले.
सादरीकरणानंतर बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले, आपल्याला निधीची कमतरता जाणार नाही. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तम असे नियोजन जिल्ह्यामध्ये करण्यात आले असून
आगामी काळात आणखी रुग्ण वाढणार नाही यासाठी काळजी घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच वेगवेगळ्या संपर्क व्यवस्था मार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
तत्पूर्वी, त्यांनी राज्यातील सर्वात मोठ्या औष्णिक वीज केंद्राला भेट दिली. तसेच हा प्रकल्प लॉकडाऊनच्या काळातही पूर्ण क्षमतेने सुरू राहील, अशी काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी उपस्थित चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे श्री. घुगे, श्री. जयस्वाल, श्री. वैद्य, श्री. भंडारकर आदी अधिकारी उपस्थित होते.