नागपूर, दि. 14 : कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील लांबलेल्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात यावी. जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी कापूस खरेदीचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, कापूस पणन महासंघाचे सरव्यवस्थापक जे. पी. महाजन उपस्थित होते.

यावेळी सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमधील कामगारांचे वेतन व भत्ते अदा करण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.
कापूस खरेदीसाठी नुकतेच ग्रेडरचे प्रशिक्षण घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्रे वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.
पाऊस सुरु झाल्यानंतर कापूस खरेदीला मर्यादा येतील म्हणून मान्सूनपूर्व कापूस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात यावे, यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत पणन महासंघाने प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधावा.













