भोपाळ : चांगल्या पावसासाठी दुष्काळग्रस्त भागात बेडकांचा विवाह लावल्याचे तुम्ही ऐकले, पाहिले असेलच; परंतु अतिवृष्टीमुळे हवालदिल झाल्याने बेडकांचा कायदेशीर घटस्फोट करण्यात आल्याची विचित्र घटना बहुधा प्रथमच घडली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुमारे दोन महिन्यांपूर्वी बेडकांचा विवाह करण्यात आला होता. इंद्रपुरी परिसरातील तुरंत महादेव मंदिरात ओम शिवशक्ती मंडळाच्या सदस्यांनी वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मातीच्या बेडकाची जोडी तयार करून त्यांचे लग्न लावले होते. मात्र, सध्या राज्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, आता पाऊस थांबावा म्हणून बेडकाच्या या जोडीचा घटस्फोट घडविण्यात आला आहे.
ओम शिवशक्ती मंडळाचे पदाधिकारी सुरेश अग्रवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्यात चांगला पाऊस पडावा म्हणून वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी जुलै महिन्यात मातीच्या बेडकाची जोडी बनवून त्यांचा विवाह करण्यात आला होता. बेडकाच्या या विवाहाने वरुणदेवता प्रसन्न झाले आणि राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला.
आता लोक या अतिवृष्टीने त्रासले आहेत. काही लोकांनी ही अतिवृष्टी थांबविण्यासाठी बेडकांचा घटस्फोट घडविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार धार्मिक अनुष्ठान आणि मंत्रोच्चारासह बुधवारी तुरंत महादेव मंदिरात बेडकाच्या या जोडीचा घटस्फोट पार पाडण्यात आला.
घटस्फोटानंतर या बेडकांचे पाण्यात विसर्जन करण्यात आले आहे. पाऊस पडावा म्हणून देशात अनेक ठिकाणी अशा प्रकारे बेडकाच्या विवाहासह अनेक उपाय केले जातात. मात्र, पाऊस थांबावा म्हणून बेडकाचा घटस्फोट करण्याची ही पहिलीच घटना असावी.
मध्य प्रदेशात यंदाच्या हंगामात ३१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. भोपाळमध्ये तर सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये राज्यात १५ जूनपासून आतापर्यंत सुमारे २०० जणांचा मृत्यू झाला आहे.