अहमदनगर : पिडीत मुलीच्या छेडछाड प्रकरणी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल.आणेकर यांनी आरोपी रोहन उर्फ राहुल दिगंबर फलके, रा.मठ पिंपरी, ता.जि. अहमदनगर यास सत्र खटल्याच्या निकालाविरूध्द न्यायालयात दाखल केलेल्या अपीलामध्ये भा.द.वि.का.क. ३५४ नुसार दोषी धरून त्यास १ महिना सक्त मजुरी व ५०हजार रू. दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील ॲड. एम.व्हि दिवाणे यांनी काम पाहिले. या खटल्याची हकिकत अशी की, पिडीत मुलगी ही मठ पिंपरी गावचे शिवारात सिना नदीच्या बंधाऱ्याजवळ नदीपात्रात शेळया चारत असताना तिचा हात धरून तिचे अंगाशी झटापट करून तिस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला,
याबाबत आरोपी राहुल फलके विरूध्द भा.द. वि.कलम ३५४ व अ.जा.ज.प्र.का.कलम ३(१)(११) प्रमाणे गुन्हयाची नोंद नगर तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली होती.
या गुन्हयाचा तपास पुर्ण झाल्यानंतर तपासी अधिकारी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी त्यावेळी तत्कालीन सहा.सत्र न्यायाधीश यांचेसमोर झाली होती.
या खटल्यामध्ये आरोपीस १ वर्ष कैदेची व रूपये ५हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.. आरोपीने या शिक्षेविरूध्द प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल.आणेकर यांचेकडे अपील दाखल केले. सत्र खटल्यामध्ये सरकारी पक्षाने त्यावेळी एकुण ६ साक्षीदार तपासले होते.
अपीलामध्ये सत्र खटल्याच्या साक्षीदारांचा पुरावा ग्राहय धरून आरोपीस पुन्हा शिक्षेमध्ये बदल करून सदर शिक्षा १ महिना सश्रम कारावास व ५०हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.