राहुरी : पाच वर्षात सत्तेवर असताना आम्ही केलेल्या विविध लोककल्याणकारी कामांमुळेच राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे महाजनादेश यात्रेनिमित्त लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अधोरेखित झाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात राहुरी फॅक्टरी येथे मुख्यमंत्री बोलत होते. राहुरी फॅक्टरी येथे देवळाली प्रवरा शहरवासियांच्या वतीने आमदार चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मुख्यमंत्री व महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खा. डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या पाच वर्षात महायुती सरकारने समाजाला बरोबर घेऊन सर्व समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले. गोरगरीब, दीनदलित जनतेसाठी आम्ही काम केले आहे.

शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. त्यानंतर आम्ही महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेकडे आलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.