अहमदनगर :- राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते आहेत. ते राज्याच्या पातळीवरील आमच्या पक्षाचे प्रमुख नेते असल्याने मुलगा भाजपमध्ये जात असताना त्यांनी त्याला रोखायला हवे होते.
दुर्दैवाने तसे घडले नाही. मुलाच्या प्रवेशानंतर आपण विरोधी पक्षनेतेपदावर राहणार आणि पक्ष सांगेल ते करणार, असे ते म्हणत असतील, तर त्यांना ते सिद्ध करावे लागेल.

त्यांना पक्षाने खूप काही दिले आहे. विखे यांनी नैतिकता म्हणून लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी,’ अशी मागणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
‘राष्ट्रवादी’ने नगर दक्षिणची जागा कॉंग्रेससाठी न सोडल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘डॉ. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला नको होता.
आपले न ऐकता मुलगा भाजपमध्ये गेल्याबरोबर राधाकृष्ण विखे यांनी सर्वप्रथम या प्रकाराचा निषेध करायला हवा होता.
मुलाने हट्ट केला, तर त्याला समजावण्याची जबाबदारी वडिलांची होती. मात्र, विखेंनी तसे काहीही केले नाही. त्यामुळे मुलाचा पक्षप्रवेश सुकर झाला.