सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले : भुजबळ

जामखेड : हे सरकार स्वता:ला ओबीसीचे कैवारी म्हणवून घेत आहे.मात्र या युती सरकारने गेल्या पाच वर्षात ओबीसी महामंडळाला एक रुपयाचाही निधी दिला नाही. शेतक­ऱ्यांच्या १६ हजार आत्महत्या झाल्या, बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे बंद पडू लागले, अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील फडणवीस सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. असा आरोप राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचर्थ आघाडीच्यावतीने जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी भूजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले सध्या देशात लोकशाही नाही तर हुकूमशाही चालत असून, यांच्या झुंडशाही विरोधात जर एखाद्याने तक्रार केली,अथवा कोणी काही बोलले की त्यांनाच देशद्रोही ठरवा असा प्रकार सध्या देशात सुरू आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे दमन करण्याचे काम सुरू आहे.