भुसावळहून मजुरांना घेऊन सहरशासाठी धावली श्रमिक एक्स्प्रेस!

Ahmednagarlive24
Published:

जळगाव, दि. १६ –  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी राज्य शासनाने स्वखर्चातून रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सुरुवातीला भुसावळातून लखनऊ व गोरखपूरसाठी विशेष गाडी सोडण्यात आल्यानंतर आज शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता प्लॅटफार्म क्रमांक सातवरून 01857 भुसावळ-सहरशा (बिहार) एक्स्प्रेस रवाना झाली.

या गाडीत जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार व बुलढाणा भागात अडकलेल्या एक हजार 224 प्रवाशांना प्रवेश देण्यात आला.

परप्रांतीय प्रवाशांना दिलासा

01857 भुसावळ-सहरशा एक्स्प्रेसने बुलढाणा येथील 212, जळगाव जिल्ह्यातील 747, धुळे जिल्ह्यातील 203 तर नंदुरबार जिल्ह्यातील 62 मिळून एकूण एक हजार 224 प्रवासी रवाना झाले.

प्रति पॅसेंजर 650 रुपयांप्रमाणे तिकीटाचा खर्च राज्य शासनाकडून करण्यात आला. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक सातवर लावण्यात आलेल्या गाडीत सोशल डिस्टन्स राखून प्रवाशांना प्रवेश देण्यात आला.

यावेळी या प्रवाशांना जेवण, केळी, पाणी बॉटल देण्यात आली. व त्यानंतर ही रेल्वे गाडी रवाना करण्यात आली.

यावेळी नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, किरण सावंत, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत,

शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदीसह  लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व त्यांचे पोलिस कर्मचारी रेल्वे चे अधिकारी,  कर्मचारी या प्रवाशांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

तत्पूर्वी या सर्व प्रवाशांना दुपारी जळगाव, धुळे, बुलढाणा व नंदूरबार येथून एसटी महामंडळाच्या 55 पेक्षा अधिक  बसमधून भुसावळ रेल्वे स्थानकावर आणण्यात आले होते.

दीड महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये अडकलेले मजूर भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहचल्यावर त्यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता.

प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या गावी जाण्यास मिळत असल्यामुळे व प्रशासनाने केलेल्या सोयीमुळे अनेक प्रवाशांनी प्रवाशांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment