कोरोना प्रतिबंध : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाणून घेतली केरळची यशोगाथा

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि. १८: कोरोना प्रतिबंधासाठी केरळ राज्याने कशा प्रकारे उपाययोजना राबविल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केरळच्या आरोग्यमंत्री  के. शैलजा यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

केरळमधील लोकसंख्येची घनता तेथील भौगोलिक, सामाजिक रचना आणि महाराष्ट्राची रचना यात बऱ्यापैकी अंतर आहे.

मात्र केरळच्या आरोग्य विभागाकडून जे काही अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याचा महाराष्ट्रात वापर करण्याविषयी विचारविनिमय केला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

सुमारे तासभर झालेल्या या संवादात केरळ राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

आज दुपारी बाराच्या सुमारास आरोग्यमंत्री श्री. टोपे आणि केरळच्या आरोग्यमंत्री श्रीमती शैलजा यांच्यात चर्चा झाली. यावेळी केरळचे आरोग्य विभागाचे सचिव श्री. खोब्रागडे उपस्थित होते.

कोरोनाला रोखण्यासाठी केरळने विशेष काही उपाययोजना केली का याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल असे  सांगत आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी चर्चेला सुरुवात केली. केरळमध्ये दिवसाला १२०० च्या आसपास चाचण्या होत असून तेथे १२ ते १३ प्रयोगशाळा असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घेत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना राज्यात आतापर्यंत ६१ प्रयोगशाळांच्या माध्यमातून पावणे तीन लाख चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

केरळचे विलगीकरणाचे धोरण, दर दिवसाला होणाऱ्या चाचण्या, झोपडपट्ट्यांमधील संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, खासगी डॉक्टरांचे सहकार्य, साधनसामुग्रीचा तुटवडा, कंटेनमेंट झोनमधील प्रतिबंध, प्लाझ्मा थेरेपीचा वापर याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

लोकसंख्या आणि तिची घनता यात दोन्ही राज्यांमध्ये कमालीची भिन्नता असल्याचे त्यांनी सांगितले.

केरळमधील रुग्ण संख्याही कमी असून तेथे खाटांची कमतरता नाही. मानसोपचार तज्ञांचे गट करून त्यांच्यामार्फत अलगीकरण केलेल्या लोकांची तसेच आरोग्य कर्मचारी यांचे समुपदेशन केले जाते.

त्याचबरोबर तेथील प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू, ख्यातनाम व्यक्ती यांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते.

ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडाचे विकार आहेत अशा लोकांना (कोमॉर्बीड) घराबाहेर पडू दिले जात नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment