मुंबई, दि. 18; महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या
विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इ. १ ली ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 5कोटी 73 लाख 30 हजार269 पाठ्यपुस्तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत 3 कोटी 87 लाख 05हजार पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत.
अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास आज शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आजपासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार आहे. असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रा. गायकवाड यांनी संवाद साधून समग्र शिक्षा अंतर्गत व विक्री करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा आढावा घेतला व त्यासंदर्भांत सर्व अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदशन केले.
यावेळी पाठयपुस्तक मंडळाचे संचालक विवेक गोसावी, गोरेगाव विभागीय भांडार व्यवस्थापक अजय यादव व भांडारातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागनिहाय भांडारांमार्फत पुढील प्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येत आहे.
नागपूर 42,92,956 प्रती
अमरावती 62,73,284 प्रती
औरंगाबाद 63,57,592 प्रती
नाशिक 94,19,702 प्रती
गोरेगाव (मुंबई) 34,70,810 प्रती
पुणे 95,90,324 प्रती
कोल्हापूर 58,59,416 प्रती
लातूर 62,64,381 प्रती
पनवेल (रायगड) 51,01,804 प्रती
दिनांक 18.5.2020 पासून मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांमधून त्यांचे कार्यकक्षेत येणाऱ्या संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदा/महानगरपालिका यांना समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
पीडीएफ पुस्तकांना भरघोस प्रतिसाद – सुमारे 81 लाख पीडीएफ झाल्या डाऊनलोड
खाजगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता ही पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात.
संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांची PDF File मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आजपर्यंत इयत्ता 12 वी च्या 20 लाख 54 हजार 194 व इयत्ता 1 ली ते 11 वी च्या 61लाख 20हजार 753 PDF File डाऊनलोड केलेल्या आहेत.
असे असुनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी होत असल्याने आज पासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे.
पाठ्यपुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्थांना करता येणार ऑनलाइन नोंदणी
राज्यातील संचारबंदीच्या काळात मंडळाच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये, म्हणून मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्या करीता पाठ्यपुस्तक मंडळाने यंत्रणा विकसित केली असून त्याचे प्रात्यक्षिक यावेळी शिक्षण मंत्री यांना दाखविण्यात आले.
पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाईन पद्धतीने 24 तासात केव्हाही मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे.
त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून त्याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना मंडळाच्या sales.ebalbharati.in या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविता येणार आहे.
बॅंक ट्रान्सफर/क्रेडिट अथवा डेबिट कार्ड तसेच RTGS/NEFT च्या माध्यमातून या पुस्तकांच्या रकमेचा भरणा मंडळाच्या पेमेंट गेट – वे मार्फत करता येणार आहे.
मंडळाकडे रक्कम भरणा केल्याची खात्री झाल्यानंतर याच सेवेमार्फत पुस्तक विक्रेत्यांना SMS पाठविण्यात येऊन पुस्तके ताब्यात घेण्याबाबत सूचना प्राप्त होणार आहेत.
यामुळे वेळेची बचत होणार असून भांडारांमध्ये गर्दी टाळता येणे शक्य होणार आहे.
मंडळाच्या सर्व भांडारांमधून पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःची योग्य ती काळजी घेऊन काम करण्याची सूचना शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सर्वांना केली.