जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत ३१६ बसेसमधून ७ हजार प्रवासी रवाना

Ahmednagarlive24
Published:

 जळगाव, दि. १८ – जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांच्या सीमेपर्यंत २७३ बसेसद्वारे ६००६ प्रवाश्यांना तसेच दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या विद्यार्थ्यांना १९ जिल्ह्यापर्यंत तर वाशिम जिल्ह्यातील मालेगावपर्यंत कामगार,

मजूर यांच्यासाठी ४३ बसेसमधुन ९४६ प्रवाशांना याप्रमाणे आतापर्यंत ३१६ बसेसमधून ६९५२ प्रवाशांना पोहचविण्यात आल्याची माहिती एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रण राजेंद्र देवरे यांनी दिली. एसटी बसमार्फत कामगार, मजूर, विद्यार्थी यांना रवाना करण्यापूर्वी या सर्वांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

त्यानुसार या मजूरांना सोडण्याची आवश्यक ती कार्यवाही व खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे.

त्यानुसार संबंधित उपविभागीय अधिकारी, तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस अधिकारी यांनी पायी जाणाऱ्या मध्यप्रदेश, तेलंगाणा आणि छत्तीसगड या राज्यांतील मजुरांना एसटी महामंडळाची बससेवा उपलब्ध करून दिली आहे.

या नागरिकांना विविध सामाजिक संस्था, व्यक्तींमार्फत फूड पॅकेट देण्यात आले. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, सॅनिटाईज करुन त्यांना रवाना करण्यात आले.

तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. यावेळी एस.टी. महामंडळासह महसुल, पोलीस, आरोग्य विभाग व परिवहन विभागाचे अधिकारी मेहनत घेत आहे.

जळगाव हा जिल्हा मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर जिल्हा असल्याने याठिकाणी इतर जिल्ह्यातून पायी आलेले अनेक मजूर लॉकडाऊनमुळे अडकले होते.

शासनाच्या निर्णयानुसार या मजूरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

या मजूरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत तसेच दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत तर राज्यांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मालेगावपर्यंत एसटी महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध आगारातून 316 बसेस सोडण्यात आल्या.

यामध्ये चोरवड या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत 201 बसेस, देवरी या छत्तीसगड राज्याच्या सीमेपर्यंत 71 बसेस व दिलोरा या तेलंगाणा राज्याच्या सीमेपर्यंत 1 आणि दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या तसेच राज्यातील मालेगाव,

(जि. वाशिम) येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी 43 बसेस याप्रमाणे गेल्या दहा दिवसात 316 बसेसमधून एकूण 6 हजार 952 प्रवाशांना या राज्यांच्या सीमेपर्यंत व राज्यातंर्गत रवाना करण्यात आले.

आज ( 19 मे रोजी) एका दिवसात मध्यप्रदेशसाठी 2 बसेसमधून 44 तर छत्तीसगडसाठी 4 बसेसमधून 88  असे एकूण 6 बसेसमधून 132 प्रवासी रवाना करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment