सोनई : गेली चार ते पाच दशके मी या परिसरात व नेवासा तालुक्यात राबलो. या माझ्या तालुक्यात समृद्धी आणायची, एवढी एकच जिद्द मनात होती. माझ्या त्या स्वप्नांना माझ्या पिढीच्या लोकांनी साथ दिली, म्हणून ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकलो. आता आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिस गोड व्हावा, एवढी एकच इच्छा आणि अपेक्षा तुमच्याकडून आहे, असे भावपूर्ण आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील प्रचारसभेत यशवंतराव गडाख बोलत होते. ते म्हणाले, नेवासा तालुक्यात उभ्या केलेल्या अनेक संस्थांच्या माध्यमातून आजवर हजारो कोटींचे चलन घराघरात पोहोचले. त्यामुळे वेगवेगळे उद्योग आणि बाजारपेठ फुलल्या आहेत.

तालुक्याचा प्रपंच सक्षमतेने चालवू शकणाऱ्या आणि तुमच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या शंकररावला निवडून द्या. आपल्या राजकीय जीवनात आपण अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले. मानाची पदे दिली. काही जण स्वार्थापायी आपली साथ सोडून गेले; पण राजकीय जीवनात आपले ध्येय निश्चित असेल, तर अशा धोकेबाजांच्या सोडून जाण्याचे वाईट वाटून घ्यायचे नसते, असे ते म्हणाले.
प्रशांत गडाख म्हणाले, साहेबांच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अध्यक्ष, सहकारी बँकेचे अध्यक्षपद, खासदार, विधान परिषद आमदार या पदांसाठी संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना साथ दिली; पण गडाख साहेबांनी याची परतफेड करीत असताना सगळ्या संस्था व नोकरीच्या संधी या फक्त नेवासा तालुक्यात आणल्या. याची जाणीव सोनई परिसर व नेवासा तालुक्याने ठेवली पाहिजे.
आजवर सोनई परिसराने साहेबांना व शंकररावांना भरभरून साथ दिली. या निवडणुकीत त्यात जास्त मताधिक्याची भर टाकून इथल्या मतदारांनी तालुक्यात आपली मन ताठ ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी महिलांनी सोनई गावातून विशाल प्रचारफेरी काढली.
- दत्तक मुलाला दत्तक पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- अर्थसंकल्प २०२६ मध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा? पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता
- नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाला गती; नाशिकच्या दळणवळण विकासाला नवे वळण
- सोयाबीनच्या भावात जोरदार तेजी; ६ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता
- मुंबईकरांना दिलासा! २०२६ मध्ये पाच मोठे पूल व उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार













