अहमदनगर :- पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना रोखण्यासाठी आता बारामतीकर पवार घराण्यातील व्यक्तीने उमेदवारी घ्यावी, अशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जोरदार नियोजन सुरू केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांना कर्जत-जामखेड मतदार संघाचे पक्षनिरीक्षक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अॅड.अमरसिंह मारकड यांना नगर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक या महत्वाच्या जबाबदार्या थेट बारामतीतून देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री शिंदे यांना शह देण्यासाठी मासाळ व मारकड हे दोन धनगर समाजातील शिलेदार कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या मैदानात उतरले आहेत. कर्जत-जामखेड हा पालकमंत्री राम शिंदे यांचा बालेकिल्ला असून ते ही धनगर समाजाचेच आहेत.
त्यांना चितपट करण्यासाठी या दोन शिलेदारांना कर्जत- जामखेड तालुक्यात घुसखोरी करणे सहज शक्य आहे, हे पवार कुटुंब निश्चित जाणून आहे. कारण किशोर मासाळ यांची अनेक आंदोलने शासनाला घाम फोडणारी आहेत. पालकमंत्री शिंदे यांच्या चोंडीत धनगर आरक्षणासाठी हल्लाबोल करून त्यांनी तुरुंगवास भोगला होता.
धनगर बांधवांचे ते नेतृत्व करतात. तर अॅड. अमरसिंह मारकड हे नियोजन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे संघटनही वाखाणण्याजोगे असून धनगर समाजाच्या हितासाठी त्यांचाही सक्रिय सहभाग असतो.
येणारी विधानसभा निवडणूक ही ‘वन अँड ओन्ली पवार’ यांनीच लढवावी, असा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमधील असलेले गट-तट, एकमेकांबद्दल असलेले समज-गैरसमज आणि त्यातच तालुक्यात असलेला अजितदादांचा अंबालिका साखर कारखाना हा देखील तालुक्याच्या आर्थिक विकासाचा मानबिंदू आहे.
शिवाय तालुक्यातील शेकडो तरुणांच्या हाताला या कारखान्यामुळे काम मिळाले आहे.त्यामुळे जनतेतून आता फक्त ‘पवार’ या नावावर उमेदवारीसाठी आग्रह धरला जात आहे.
गेली वर्षभरापासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक सभा व कार्यक्रमाला हजेरी लावून तालुक्याच्या उमेदवारीबाबत आशा पल्लवित केल्या होत्या. त्यानंतर आता युवा वर्गावर भुरळ घातलेले शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गेली अनेक महिन्यांपासून तालुक्याच्या दौर्यावर लक्ष केंद्रित करत आपली छाप पाडली आहे.