मुंबई, दि.२०: राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
कोविड-१९ या विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपुरवठा, पीपीई कीट, मास्क याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी उत्पादकांसोबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते.
या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, हाफकिन संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना झालेल्या व्यक्तीला उपचाराचा भाग म्हणुन रक्ताची आवश्यकता नसली तरी अशा व्यक्तीला जर ॲनेमिया किंवा इतर आजार असतील अशा परिस्थितीत त्याला रक्ताची आवश्यकता भासू शकते.
याशिवाय इतर शस्त्रक्रिया, बाळंतपण आणि थॅलेसेमिया, काही कॅन्सर सारख्या आजारपणासाठी रक्ताची आवश्यकता असते. राज्यातील सर्व ब्लड बॅंक यांचा व्हॉट्सॲप गृप तयार करुन वेळोवेळी याची माहिती घेतली जाते.
आपल्या जवळच्या ब्लड बॅंकेत, रुग्णालयात किंवा आपल्या सोसायटीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करावे असेही आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे.
सध्या राज्यात उपलब्ध असलेला रक्तसाठा लक्षात घेता रक्तदात्याची संपूर्ण सुरक्षितता राखून छोटे छोटे कॅम्प घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी औषध प्रशासनाचा पुढाकार
कोरोनाच्या उपचारासाठी प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी केंद्राकडून लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने मिळवून देण्यात औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन सर्व परवानगी केवळ दोन दिवसात मिळवून दिल्या त्याबद्दल उपस्थित रक्तपेढी चालकांनी अधिकाऱ्याचे यावेळी आभार मानले.
खासगी डॉक्टरांना मिळतील पीपीई किट
खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासण्यासाठी आपले दवाखाने सुरु करावेत, असे डॉ. शिंगणे यांनी आवाहन केले आहे.
पीपीई किट आणि एन ९५ मास्क याचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान दहा केमिस्टच्या दुकानांमधून पीपीई किट आणि एन ९५ मास्क विक्रीस ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे.
कोरोना या आजारा व्यतिरिक्त इतर रुग्ण तपासण्यासाठी खासगी दवाखाने सुरु ठेऊन रुग्ण सेवा करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.