‘थँक्यू थोरात साहब’ म्हणत परप्रांतीय मजुरांकडून कृतज्ञता व्यक्त

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी,दि.20 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजुरांची कामे बंद झाली. यामुळे या बंद काळात अनेक मजुरांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला.

या सर्वांना मदत व्हावी यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या जेवण व प्रवासाची व्यवस्था केली. संगमनेर येथून 1662 परप्रांतियांनी त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर तेथून ‘थँक्यू थोरात साहब’ असे म्हणत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सर्व संगमनेरवासीय व महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

मंत्री श्री. थोरात यांच्या पुढाकारातून राज्यातील सर्व  परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर या सर्व परप्रांतीय मजुरांना जेवणाची,  राहण्याची व  औषधोपचाराची सुविधाही देण्यात आली होती.

राज्यात हे मदतकार्य सुरू असताना संगमनेर तालुक्यातही अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या बसेस उपलब्ध करुन देऊन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड या ठिकाणी जाणाऱ्या विविध परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली.

अनेक गावातून पायी चालणाऱ्या या परप्रांतीय मजुरांना संगमनेर तालुक्यात मायेचा वेगळाच ओलावा अनुभवायला मिळाला. अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरु करण्यात आली.

तर काही ठिकाणी या मजुरांसाठी आंघोळीची व्यवस्था, औषधोपचाराची व्यवस्था व निवासाची, आरामाची व्यवस्थाही करण्यात आली होती. या मदतीमुळे संगमनेरवासियांच्या माणुसकीचे कौतुकही झाले.

मंत्री श्री. थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये आलेल्या परप्रांतीय मजुरांना बसच्या माध्यमातून अहमदनगर येथे सोडण्यात आले.

अहमदनगर येथून रेल्वेने हे परप्रांतीय मजूर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व झारखंड या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र परप्रांतीय मजुरांनी भावनिक होऊन “थँक्यू थोरात साहब” म्हणत त्यांच्या कार्यालयात फोन करून व एसएमएस’द्वारे आपली कृतज्ञता व्यक्त केली.

उत्तर प्रदेशमधील आपल्या गावी परतलेल्या रामविलास वर्मा यांनी म्हटले,  थँक्यू थोरात साहेब. महाराष्ट्राचे आम्हाला प्रेम मिळाले. आपुलकी मिळाली ती जगाच्या पाठीवर कुठेही मिळाली नाही.

महाराष्ट्रामुळे आमचे कुटुंब रोजीरोटी मिळवत आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार जरी बंद झाला तरी महाराष्ट्रातील जनतेने आमची मदत केली.

ती आम्ही जीवनात कधीही विसरू शकणार नाही. संगमनेरकर तर आम्हाला आमच्या कुटुंबातले आहेत. खरे तर संगमनेर गाव सोडताना खूप भावना अनावर झाल्या होत्या.

आपण आम्हाला जेवणाखाण्याची, राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली त्याबद्दल संपूर्ण उत्तर प्रदेशमधील मजुरांच्या वतीने आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत.

कोरोनाचे संकट संपले की आम्ही पुन्हा महाराष्ट्रात परतणार आहोत आणि महाराष्ट्रात व देशाच्या विकासात आमच्यापरीने योगदान देऊ असा, भावनिक संदेशही त्यांनी दिला.

कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रभावीपणे काम करत असून या संपूर्ण लॉकडाऊन काळामध्ये संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी ही कौतुकास्पद असून परप्रांतीय मजूर,

रोजंदारी करणारे कामगार यांच्यासाठी विविध संघटनांनी सुमारे 3 हजार 500 डबे देण्याच्या उपक्रमासह लॉकडाऊन काळात सातत्यपूर्ण केलेले मदतकार्य हे राज्यासाठी मॉडेल ठरणारे असल्याचे गौरवौद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच काढले होते.

संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला असून ज्या ज्या सेवाभावी संघटना व पदाधिकाऱ्यांनी  मदत केली त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment