विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील दीड हजार कामगार स्वगृही रवाना

Ahmednagarlive24
Published:

अमरावती, दि. 20 : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील 1 हजार 544 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस आज सायंकाळी सहाच्या सुमारास अमरावती रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशकडे रवाना झाली.

घरी परतण्याचा आनंद व्यक्त करत व ‘भारतमाता की जय’चा घोष करत कामगार बांधव आपल्या गावाकडे परतले.

अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विना थांबा उत्तर प्रदेशातील देवरिया रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे.

ही एक्स्प्रेस 24 डब्यांची असून, त्यातून 1 हजार 544 प्रवासी नागरिक रवाना झाले. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल,

उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातून 500, अकोला जिल्ह्यातून 280, बुलडाणा जिल्ह्यातून 442, वाशिम जिल्ह्यातून 101 व यवतमाळ जिल्ह्यातील 221 प्रवासी असे मिळून 1 हजार 44 प्रवासी रवाना झाले.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. सिंह व जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी प्रवाशांची विचारपूस करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून व मास्कचा वापर ठेवून स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

रेल्वे स्थानकावर प्रथमत: सर्व प्रवासी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. अमरावतीच्या नानकरोटी उपक्रमाच्या सहकार्याने प्रवासी बांधवांसाठी भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. त्याबद्दल उपक्रमाच्या सर्व मान्यवर कार्यकर्त्यांचे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आभार मानले.

प्रवाशांच्या चेहऱ्यावर परतण्याचा आनंद झळकत होता. सायंकाळी सहा वाजता ट्रेन सुटताच सर्वांनी ‘भारतमाता की जय’चा घोष केला व उपस्थितांना हात हलवून निरोप दिला.

टाळेबंदीमुळे अडकून पडल्यामुळे घरी परतता येत नव्हते. मात्र,  शासनाने आमची दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्ही अनेक दिवसांनी सुरक्षितपणे घरी परत जाऊ शकत आहोत.

आमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना अनेक दिवसांनी भेटता येणार आहे. घरी परतण्याचा आनंद  अवर्णनीय आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी विविध प्रवासी बांधवांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment