अतिवृष्टीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – आ. गडाख

Ahmednagarlive24
Published:

नेवासा :- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे आठ दिवसात सरसकट पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, नेवाशाचे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली. 

गुरुवारी सायंकाळी आदित्य ठाकरे यांच्यासमवेत शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. त्यात सेनेला पाठिंबा दिलेले आमदारही होते. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून,

त्यात खरिपाच्या पिकांसह इतर बारमाही पिके व फळबागांचेही नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. म्हणून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशी विनंती सेना आमदारांनी राज्यपालांना केली होती. 

नवीन शासन सत्तेवर येण्यास काही अवधी लागणार असल्याने आपल्या स्तरावर त्वरित निर्णय घ्यावेत, अशी विनंती राज्यपालांना केली होती. मुख्य सचिवांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासनही राज्यपालांनी दिले होते. अपेक्षेप्रमाणे मुख्य सचिवांशी चर्चा झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे त्वरित सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे आ. गडाख यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment