अकोला,दि.२१ (जिमाका) : कोरोना विरुद्धच्या लढाईत शक्य त्या सर्व मार्गाचा अवलंब करण्याची गरज असून रेड क्रॉस सोसायटीने होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय बाब आहे, अशा शब्दात पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज रेडक्रॉसच्या उपक्रमाचे कौतुक केले.
रेड क्रॉस सोसायटीच्या मार्फत कोरोना प्रतिबंधक परिणामकारक असलेल्या होमिओपॅथी औषधांच्या वितरणाचा प्रारंभ आज श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच रेड क्रॉस चे उपाध्यक्ष प्राचार्य
डॉ. किशोर मालोकार, इंडियन सोशल रिसर्च फाऊंडेशनचे संदीप पुंडक, होमिओपॅथिक डॉक्टर संदीप चव्हाण, जिल्हा परिषद वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना साबळे, डॉ. प्रज्ञा खंडेराव, रेड क्रॉस चे
डॉ. इर्शाद सहाय्यक मंगला डोंगरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी श्री. कडू म्हणाले की, आज या राष्ट्रव्यापी संकटाच्या वेळी सर्व भेदभाव विसरून एकत्रपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्येकाच्या घरी हे औषध पोहोचवले पाहिजे आणि त्यासाठी सर्व होमीयोतज्ज्ञांनी रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एका लहान बाटलीत पाच जणांचे कुटुंब औषध घेऊ शकते, असेही त्यांनी सांगितले
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शक्य त्या सर्व माध्यमातून हे औषध गरजू रुग्णापर्यंत पोहोचविण्याचा सूचना यावेळी उपस्थितांना केल्या.
मनपा क्षेत्रात सर्व आशा सेविका आणि निरीक्षकांच्या माध्यमातून हे औषध गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल असे आयुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मानद सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी केले.