तर मी उमेदवारी न करता पाचपुतेंचा प्रचार करेन : आमदार जगताप

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे – नगर मतदारसंघात नागवडे-जगताप यांच्यापैकी एकच उमेदवार असेल. आम्ही शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांच्या तालमीतले असून सयाजीरावांना पुन्हा एकदा घरी बसवणार आहोत, असे आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता कुकडी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी सांगितले.

बबनराव पाचपुते यांनी ३० ते ३५ वर्षे राजकारण केले. आमदार, मंत्री म्हणून काम केले, पण सुप्रमा, बोगदा, साकळाई, सीना, एमआयडीसी हे प्रश्न मार्गी लावले नाहीत.

त्यांनी केलेली ३५ वर्षांतील विकासकामे आणि मी केलेली ५ वर्षांतील विकासकामे यातील तफावत संत शेख महंमद महाराजांच्या मंदिरात समोरासमोर बसून सिद्ध करा, जर माझ्या पाच वर्षांतील कामे त्यांच्या कामापेक्षा जास्त नसली, तर मी उमेदवारी न करता पाचपुतेंचा प्रचार करेन, असे आमदार जगताप म्हणाले.

पाचपुते यांनी महाजनादेश यात्रेत सांगितले की, मी आघाडी सरकारमध्ये असताना फक्त सह्या करायचो. मी फक्त सयाजीराव होतो. या सयाजीरावला पुन्हा एकदा घरी बसवणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. अनेक सभासदांनी सूचना केल्या.

सर्व सूचना अंमलात आणल्या जातील, असे आश्वासन देऊन कारखान्याचे अध्यक्ष आमदार जगताप म्हणाले, कुकडीने मागील वर्षी २३०० रुपयांप्रमाणे पेमेंट दिले.

एफआरपी १८०० रुपये होती, आपण ५०० रुपये जास्त पेमेंट दिले. त्यामुळे काही तांत्रिक अडचण निर्माण होऊन पेमेंटला अडचण आली. ती दूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे दोन दिवसांत वर्ग होतील.

यावेळी बाबासाहेब भोस, दत्तात्रय पानसरे, दिनकर पंधरकर, हरिदास शिर्के, सुभाष डांगे, बाळासाहेब उगले, संभाजी दिवेकर, स्मितल वाबळे यांच्यासह अनेक सभासदांची भाषणे झाली.

माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, सतीश मखरे, गणेश भोस, एम. डी. शिंदे, सुभाष डांगे, भगवान गोरखे यांच्यासह श्रीगोंदे तालुक्यातील कुकडी कारखान्याचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment