पाच वर्षांच्या ‘गुडिया’ची कोरोनावर मात!

Ahmednagarlive24
Published:

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : लहान असो वा वयस्क सर्वांचाच कोरोनाने पिच्छा पुरविला आहे. मोठ्या शहरांमध्ये, तर कोरोनाचे साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या ‘गुडिया’ ने कोरोनाशी चिवट झुंज दिली.

मुंबई येथून गावाकडे आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर सेंटरला दाखल होती. या गुडियाने कोरोनावर मात करीत आज सर्वांना सुखद धक्का दिला.

ही गुडिया आनंदाच्या भावमुद्रेत सेंटरच्या बाहेर पडली व टाळ्या वाजवून उपस्थितांनी तिचे स्वागत केले.  गुडियाच्या सुट्टीमुळे मलकापूर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 37 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 26 रूग्ण बरे होवून आपल्या स्वगृही परतले आहेत. नरवलेच्या गुडियाला केंद्र शासनाच्या नवीन निकषांनुसार कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून न आल्यामुळे सुट्टी देण्यात आली. यानंतर तिला घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर तालुक्यातील येथील पाच, खामगाव तालुक्यातील दोन, शेगाव येथील तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील 2, देऊळगाव राजा येथील दोन, चिखली येथील तीन, बुलडाणा येथील 8 व जळगाव जामोद येथील एक अशाप्रकारे 26 रुग्णांचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नरवलेच्या या चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ देवून चिमुकलीचे स्वागत केले.

यावेळी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी गुडीयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच गुडीयाला मोठ्या आनंदाने निरोप दिला.

शासनाच्या रुग्णवाहिकेतून तिला घरी सोडण्यात आले. यावेळी गुडियाच्या पालकांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या काळजीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच सर्वांना धन्यवादही दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment