‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या तत्पर प्रयत्नामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला

Ahmednagarlive24
Published:

मुंबई दि:२४- महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला असल्याची घटना नुकतीच घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी, महाराष्ट्र सायबर विभाग हा २४ तास covid-19 संदर्भात समाज माध्यमावर निगराणी ठेवून आहे. यादरम्यान त्यांना इन्स्टाग्रामवर  एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट आढळून आली.

ही बाब विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांना कळताच, त्यांनी संभाव्य घटनेचे  गांभीर्य ओळखून तातडीने पुढील पाऊल उचलले. सायबर सेल मधील तज्ज्ञांकडून संबंधित मुलीच्या अकाऊंटचे डिटेल्स तात्काळ शोधून काढले. ते पश्चिम बंगालमधील बराकपूर येथील आढळून आले.

त्यांनी तातडीने बराकपूर सायबर सेलचे पोलीस अधिकारी सत्यजित मंडल यांच्याशी संपर्क साधून संबंधित मुलीचा मोबाईल क्रमांक व सविस्तर माहिती देऊन संभाव्य घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. बराकपूर पोलिसांनी  तत्परतेने त्या मुलीचा शोध घेऊन तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.

या सर्व घटनेत संपर्कासाठी थोडा जरी अवधी लागला असता तरी मुलीचा जीव जाण्याची दुर्घटना घडली असती पण सुदैवाने योग्यवेळी संपर्क झाल्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला याचे सर्व श्रेय महाराष्ट्र सायबर सेल मधील अधिकारी-कर्मचारी तंत्रज्ञ व अत्याधुनिक यंत्रणेला असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. यादव यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment