मुंबई, दि २६ : लोकशाही मुल्यांचे अग्रणी पुरस्कर्ते, जाती अंतासाठी, स्त्री उत्थानासाठी आणि कर्मकांड विरहित समाज निर्मितीसाठी आयुष्य वेचणारे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. तसेच अक्षय्यतृतीयेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे संदेशात म्हणतात, महात्मा बसवेश्वर यांनी अनुभवमंटप संकल्पनेतून लोकशाही मुल्यांना अधिष्ठान प्राप्त करून दिले. समाज कर्मकांड विरहित असावा.
स्त्रियांनाही बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. कर्तुत्व हेच श्रेष्ठ आणि श्रमाधिष्ठीत समाज निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या शिकवणीचा आदर करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी अक्षय्यतृतीयेनिमित्तही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.’ हा सण आपल्याला नवनिर्मिती, निसर्गातील अक्षय ऊर्जेची जाणीव करून देतो. परस्परांप्रती समर्पण आणि दानशूरता या मुल्यांचे जतन हे या सणाचे वैशिष्ट्य आहे. यातूनही आपण आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा घेऊ या.’