कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार

Ahmednagarlive24
Published:

पुणे दि.२६: कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकांची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

पी एम पी एल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस पी एम पी एल च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नयना गुंडे, सह व्यवस्थापक अजय चारठणकर,सुनील बुरसे,अनंत वाघमारे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.

पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या नोंदणी झालेल्या शासकीय व खाजगी आशा एकूण २ हजार ३४२ रुग्णवाहिका असून सध्या कोविड रुग्ण वाढत असून रुग्णवाहिकेची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत.

त्यासाठी पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बस या रुग्ण वाहिकेत आवश्यकतेनुसार रूपांतरित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

या सर्व रुग्णवाहिकांना जी पी एस प्रणाली बसवण्यात येणार असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वॉर्डनिहाय या रुग्णवाहिका थांबवण्यात येतील.

रुग्णांना नेण्यासाठी  जवळची रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता डॅशबोर्डमुळे त्वरित समजून येईल व रुग्णाला तातडीने दाखल करणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून रुग्ण व मृतदेह हाताळताना पीपीई किट,मास्क,ग्लोव्हज हे घालणे अनिवार्य राहील .

कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असतीलअसे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बसमध्ये सुधारणा करून त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाबरोबर समन्वय ठेवला जाईल असे पी एम पी एल च्या श्रीमती गुंडे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment