नंदुरबार दि.26 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात परतलेल्या व जॉब कार्ड असलेल्या जिल्ह्यातील एक लाख मजूरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
पालकमंत्री पाडवी यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे यासंबंधी सूचना दिल्या आहेत.
राज्य व परराज्यात रोजगारासाठी गेलेले मजूर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात परतले आहेत. अशा मजूरांना रोजगार नसल्याने त्यांना उदरनिर्वाह भागविण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
जॉब कार्ड उपलब्ध असलेल्या मजुरांना प्राधान्याने कामे उपलब्ध करून देण्यात यावीत. यासाठी सर्व यंत्रणांना कामे सुरू करण्यासाठी निर्देशित करण्यात यावे.
जॉब कार्ड नसलेल्या मजुरांची जॉब कार्डधारक म्हणून तातडीने नोंदणी करण्यात यावी. मजूरांना कामाची मागणी नोंदणी करण्याबाबतच्या प्रक्रियेची माहिती ग्राम रोजगार सेवकामार्फत देण्यात यावी.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करतील याची वेळोवेळी खात्री करण्यात यावी. येणारा पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता पुढील 15 दिवसात अधिकाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
याबाबत मोहिम स्तरावर नियोजन करून एक लाख मजुरांना रोजगार मिळेल यादृष्टीने नियोजन करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.