शिर्डी :- कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, तसेच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
या दोन्ही निर्णयामुळे संस्थानच्या तिजोरीवर वर्षाला 25 कोटींचा अधिक बोजा पडणार असल्याचही हावरे यांनी सांगितल. गेल्या पंधरा वर्षांपासून शिर्डी संस्थानकडे अगदी तोकड्या पगारावर काम करणाऱ्या अडीच हजार कंत्राटी कामगारांच्या लढ्याला अखेर यश आलं.
2018 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना साई संस्थान सेवेत कायम करण्याचा निर्णय संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना संस्थानच्या दोन्ही रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा दिली जाईल. गंभीर आजारासाठी इतर दवाखान्यात उपचारासाठी एक लाखापर्यंत उचल दिली जाईल.
सोबत मुलांच्या शिक्षणासाठी संस्थानच्या शाळेत शुल्क परतावा देण्याचा आणि महिन्याला चार पगारी सुट्ट्या देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात यापुढे 40 टक्के वाढ होऊन सर्व सुविधा मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.