नगर जिल्ह्यासाठी कांदा अनुदानासाठी ७३ कोटी मंजूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- ‘राज्यात कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी ७३ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच प्रसन्ना कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे’, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात कांदा अनुदान वितरित केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील ९२ हजार ५८७ पात्र लाभार्थींनी बाजार समितीत संपर्क साधावा. बाजार समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्रे द्यावीत.

अनुदान वितरण बँकेमार्फत केले जात असून या बँकेचे प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. अनुदानाबाबत काही अडचणी असल्यास या प्रतिनिधींच्या टीमशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी बाजार समित्यांमध्ये १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कांदाविक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील हे अनुदान आहे. यामध्ये राज्यातील ३ लाख ९३ हजार ३१७ लाभार्थींना ३८७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment