पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची रामावर आली वेळ !

Ahmednagarlive24
Published:

कर्जत :- दहा वर्षे कर्जत-जामखेडची आमदारकी, पाच वर्षे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, सहा खात्यांचा कारभार असे भाग्य लाभलेल्या मंत्री राम शिंदे यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या.

मात्र, मंत्रिपदाचे वलय प्राप्त झाल्यानंतर कमी झालेला जनसंपर्क आणि ठरावीक लोकांनाच जवळ करण्याची प्रवृत्ती आड आली.

पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची वेळ रामावर आली. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, खूषमस्कऱ्यांचा हव्यास याचा फटका शिंदे यांना बसला.

जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न जे लोक तळमळीने मांडू इच्छित होते, त्यांच्याशी शिंदे यांनी कधीच आत्मियतेने चर्चा केली नाही.

एसटी बस व आगाराचा प्रश्न महत्त्वाचा होता. जामखेडहून पुण्यासाठी बस नान्नज, जवळा या मोठ्या गावातून सोयीच्या रस्त्याने पाठवण्याऐवजी आडवळणाच्या लहान गावांकडून त्यांनी सुरू केल्या.

परांडा, तुळजापूर, बार्शीसाठी नव्या मार्गाने सुरू केलेल्या बसगाड्या काही कारणे देऊन बंद करण्यास भाग पाडल्याने लोकांमध्ये नाराजी होती.

मोठी गावे वगळून अडवळणी व लहान गावात शेती महाविद्यालय सुरू करण्याचा हटवादीपणा, बेरोजगार तरुण-तरुणींसाठी उद्योगधंदे, मोठ्या गावांमध्ये राष्ट्रीय बँका सुरू करण्याकडे दुर्लक्ष,

रस्तेविकासाचा गवगवा, पण दर्जाकडे दुर्लक्ष यामुळे जनता नाखूष होती. शेतीला पाटपाणी, तलाव पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याकडेही लक्ष दिले गेले नाही.

औद्योगिक वसाहतीच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. रोजगाराभिमुख प्रशिक्षण व उच्च शिक्षण सुविधा उभारल्या गेल्या नाहीत,

ह्या सगळ्याचा फटका पालकमंत्री शिंदे यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला,व वनवासात जाण्याची वेळ आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment