मुंबई दि. 27: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.
ही कापूस खरेदी दि. 15 जूनपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. आज मंत्रालयातून राज्यातील कापूस खरेदीबाबत जिल्हाधिकारी,
डीडीआर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आढावा घेऊन संवाद साधला, त्यावेळी सहकारमंत्री श्री. पाटील यांनी वरील सूचना केल्या.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी, शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात ,
कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या-त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी. सर्व खरेदी विक्री व्यवहारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे,
इतर राज्यातील कापूस खरेदी संपुष्टात आल्याने सीसीआय ने आपले ग्रेडर राज्यातील केंद्रांवर तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.
सीमेलगतच्या जिल्ह्यात परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या कापसाच्या खरेदीची शक्यता असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या हद्दींवर चेक पोस्टद्वारे त्यावर नियंत्रण ठेवावे.
वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी ,कापूस खरेदी केंद्रावरील तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामे कमी पडणार नाहीत त्यामुळे कापूस खरेदीला गती द्यावी अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.
यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, सीसीआच्या सीएमडी श्रीमती अल्ली राणी, कॉटन फेडरेशनचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन संचालक सुनील पवार, वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशंकर उपस्थित होते.