मजूरांना रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

Ahmednagarlive24
Published:

यवतमाळ : अडकलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक आले आहेत. यात मजूरांचाही समावेश आहे. ‘

मागेल त्याला काम’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तसेच बाहेरून आलेल्या मजूरांना रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासून योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मग्रारोहयोच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मनोज चौधर आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, रोजगारासाठी बाहेर राज्यात व जिल्ह्यात गेलेले मजूर स्वगृही परत आले आहेत.

दैनंदिन कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांना कामाची गरज आहे. ३१ मे नंतर हे मजूर कामे मागण्यासाठी येतील. त्यांना रोहयोची कामे उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे.

त्यामुळे आतापासूनच उत्कृष्ट नियोजन करून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर रोहयोची कामे तातडीने सुरू करा. या मजूरांना जॉब कार्ड उपलब्ध करून द्या.

मजूरांना काम देण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठेवण्यासाठी योग्य नियोजन करा. तसेच काम मागणाऱ्या मजूराला आपण काम दिले, असे दिसले पाहिजे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

तालुका व ग्रामस्तरावर मजूरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी विस्थापित मजूरांची गावनिहाय माहिती संकलित करावी.

त्यानुसार काम उपलब्धतेबाबत नियोजन करावे. पावसाळ्यात सुरू होणाऱ्या कामांचा सेल्फ तयार करावा. रोहयोच्या सुरू होणाऱ्या कामांना विनाविलंब तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी.

तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागाशी समन्वय ठेऊन कोणीही कामापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान ५ ते १० कामे सुरू होणे आवश्यक आहे. तसेच पंचायत समिती व तालुकास्तरावर मजूरांना जॉब कार्ड देण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे.

सध्या जिल्ह्यात रोहयोअंतर्गत २५७१ कामे सुरू असून एकूण मजूरांची उपस्थिती १८३०८ आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

रोहयो अंतर्गत सुरू होऊ शकतात ही कामे : ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते व खडीकरण, सार्वजनिक दगडी रस्त्याचे बांधकाम व दुरुस्ती, माती मुरुम रस्त्याचे बांधकाम, सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम, गुरांचा गोठा व कुक्कुटपालन शेड बांधकाम,

शोष खड्डा, वृक्ष लागवड-खड्डे खोदणे व संगोपन, शेततळे, पांदण रस्ते, फळबाग लागवड, खत व गांढूळ कंपोस्ट सेंद्रीय खत निर्मितीसाठी खड्डा, सार्वजनिक पाण्याची विहीर व सिंचन विहिरीचे बांधकाम, घरकुल बांधकाम यासोबतच इतर विभागाची कामे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment