नागपूर, दि. २७ : कोरोनाबाधित सहा नागरिकांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी उपचारानंतर तसेच त्यांच्या दोन्ही तपासणीमध्ये कोरोना विषाणू आढळून न आल्याने आज सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्याने टाळ्या वाजवून निरोप दिला.
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये जबलपूरचे चार, संतरजीपुरा व कामठी येथील सहा नागरिकांना 12 एप्रिल रोजी तपासणीमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्यानंतर भरती करण्यात आले होते.
तत्पूर्वी त्यांना आमदार निवास येथे कॉरान्टाईनमध्ये ठेवण्यात आले होते. 25 एप्रिल रोजी त्यांचे तपासणी केली असता व त्यानंतरही दुसऱ्यांदा तपासणी केली असता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मेयो रुग्णालयात कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भरती करण्यात आले असून या काळात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांने अत्यंत चांगल्या वातावरणात उपचार केले. त्यामुळेच कोरोनामधून बाहेर पडणे शक्य झाले.
कोरोनाबाधित रुग्णांनी डॉक्टरांना संपूर्ण सहकार्य केल्यास कोरोनापासून सहजपणे बरे होऊ शकतो असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता अजय केवलिया, डॉ.सागर पांडे, मेडिसीन विभागाचे डॉ. पराते, कोविडच्या प्रमुख डॉ.राखी जोशी, डॉ. रवि चव्हाण आदी उपस्थित होते.