कोरोनाबाधित महिलांच्या बाळांसाठी ‘मिल्क बँक’

Ahmednagarlive24
Published:

आईला कोरोना झाला तर बाळाला आईजवळ जाता येत नाही. परंतु ही अडचण काही अंशी ससून हॉस्पिटलमधील मिल्क बँकेमुळे दूर झाली आहे.

पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे  ‘ससून’ हे नामांकित हॉस्पिटल आहे. तुरुंगातील बंदिवानांना टेलिमेडिसीनद्वारे उपचार पद्धती असो की, ज्या बाळांना आईपासून दूध मिळत नाही अशांसाठी मिल्क बँक उपक्रम  असो. या रुग्णालयाने नवनवीन प्रयोग करुन नावलौकिक मिळविला आहे.

सध्या कोरोनाबाधित रुग्ण ससूनमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. जुना खडकी बाजार येथील एक 25 वर्षीय महिला 16 एप्रिल रोजी ससून रुग्णालयामध्ये दाखल झाली. ती कोरोनाबाधित होती. तिने शनिवारी एका बाळाला जन्म दिला. परंतु  बाळालाही कोरोनाची लागण झाली असेल या चिंतेत संपूर्ण कुटुंबीय व डॉक्टर होते.

सुदैवाने बाळाचे नमुने निगेटिव्ह आले. तथापि, इच्छा असूनही बाळाला आईजवळ ठेवता येत नाही. त्यामुळे बाळाला नवजात शिशु कक्षात वेगळे ठेवण्यात आले. या कक्षामध्ये डॉक्टर व परिचारिका काळजी घेत आहेत. परंतु बाळाला आईच्या दुधापासून वंचित राहावे लागत आहे. अशावेळी मदत होत आहे, ससूनमधील मिल्क बँकेची…!

मिल्क बँक म्हणजे ज्या महिलेला दूध अधिक असतो, ते अधिकचे दूध मिल्क बँकेत साठविण्यात येते आणि ज्या बाळाला आईचे दूध मिळत नाही, त्यांना या मिल्क बॅंकेतून दूध दिले जाते. ह्या कोरोनाबाधित आईचे बाळ ठणठणीत आहे. तसेच जी मुले कोरोनाबाधित आहेत, त्यांच्यावरही ससून मध्ये उपचार सुरु आहे. दीड-दोन वर्षांचे पाच लहान मुले आहेत.

त्यांना आई जवळ जाता येत नाही. अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुले बाधित असली तरी त्यांच्यातील लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत.

लहान मुले एका जागेवर बसून राहत नाही. त्यासाठी त्यांना विविध खेळणी, रंग, पुस्तकांमध्ये गुंतवून ठेवणे आवश्यक असते, त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने ही काळजी घेतली आहे.

….अशी चालते दूध संकलनाची प्रक्रिया

दूध बँकेत ज्या मातांच्या शरीरात दुधाचे प्रमाण जास्त आहे, त्या मातांची दूध संकलनाच्या दृष्टीने सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी केली जाते. दुधावाटे लहान बाळांना रोगांची लागण होऊ नये ,याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून दान करण्यात आलेल्या दुधाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. विशेष म्हणजे आई-वडिलांच्या परवानगीनंतरच बाळाला दूध पाजण्यात येते.

आज रोजी ससून रुग्णालयात 5 मुले कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी एक 5 महिन्याचे असून उर्वरित चार मुले 7 ते 11 वयोगटातील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment