संगमनेर :- निमोणमधील सभेत बालकाने खालच्या पातळीवर टीका केली. या टीकेकडे आपण फार गांभीर्याने बघत नसलो, तरी हे बालक सभेत खुनशीने बोलत असताना व्यासपीठावर आईसाहेबदेखील टाळ्या वाजवत होत्या.
पक्षाने सांगितले म्हणून यांना दोनदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करणारा मी आहे, असे आमदार बाळासाहेब थोरात विखे माय-लेकांचे नाव न घेता म्हणाले.

थोरात-विखे संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून याला कारणीभूत डॉ. सुजय विखे ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील निमोणमध्ये त्यांनी एका कार्यक्रमात खालच्या पातळीवर जात आमदार थोरात यांच्यावर टीका केली.
टीकेकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या थोरात यांनी आता या टीकेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याने हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
नान्नज दुमाला येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.
नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, लक्ष्मण कुटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा आेहोळ या वेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, निळवंडे धरणावरून सध्या वातावरण खराब करण्याचा काहींचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, निळवंडे केवळ आपल्यामुळेच झाले हे कुणाला नाकारता येणार नाही.
वास्तविकता आपण बोलून जातो. मात्र, त्याचे पडसाद मागून उलटतात. फाटे फोडणारे अनेक आहेत. त्यांचा विंचू चढवायचा कार्यक्रम मोठा असतो.
हेलिकॉप्टर आणलं की, सभेला गर्दी वाढते. उसाला शंभर रुपये भाव कमी केल्यास मी कायम हेलिकॉप्टरने फिरेन. त्यांच्याकडे सत्तेची, पैशांची ताकद आहे. पोरगं वेगळं बोलायला लागले.
त्याला लहान-मोठं काही लक्षात येत नाही. शेजारच्या गोगलगावमध्ये काय अवस्था आहे. तिथे जवळच पोहण्याचे स्विमिंग टँक आहेत, तळे भरलेले आहे.
मात्र, त्यातील तांब्याभरदेखील पाणी उचलण्याचा अधिकार कोणाला आहे का. वाईट याचे वाटते की, हे बालक खुनशी बोलत असताना आईसाहेबदेखील टाळ्या वाजवत होत्या.
संगमनेर तालुक्याचे राजकारण सर्वात चांगले आहे. उजरा-उजरी, जिरवा-जिरवी असा कार्यक्रम येथे नाही. विराेधकांचीदेखील कामे आपण केली, असे ते म्हणाले.