अहमदनगर :- शालेय आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा ठरणार्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (दि.1) सुरुवात होत आहे. जिल्ह्यात एकूण 75 हजार 83 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यात एकूण 176 परीक्षा केंद्रांवर ही लेखी परीक्षा होणार आहे. नगर शहरात 17 केंद्र असून 7 हजार 600 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत.
गेल्या 21 फेब्रुवारीपासुन बारावीच्या परीक्षेस सुरूवात झालेली आहे. त्यापाठोपाठ उद्यापासून 10 वीच्या परीक्षेस गणित विषयाच्या पेपरपासुन सुरूवात होणार आहे.
परीक्षेमध्ये कॉपीसह इतर गैरप्रकार रोखण्यासाठी एकूण 11 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच संवेदनशील परीक्षा केंद्रांचे व्हिडिओ शुटिंगही केले जाणार आहे.
दरम्यान, परिक्षेला जाताना विद्यार्थ्यांना तणाव येऊ नये यासाठी विविध सामाजिक संघटनांसह परीक्षा केंद्रावर मुलांचे स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रस्तरावर दक्षता पथक निर्माण करण्यात आले आहे. परीक्षाकेंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.