पुणे, दि.28 : शासनाच्या निर्देशानुसार पुणे विभागात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर गरीब व गरजू लोकांना अन्न मिळावे म्हिणून शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. पुणे विभागात 19 हजार 534 गरजू नागरिकांनी या थाळीचा लाभ घेतला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 7 हजार 500, सातारा 2 हजार 500, सांगली 2 हजार 250, सोलापूर 4 हजार 200 व कोल्हापूर 3 हजार 600 गरजू व्यक्तींनी या भोजन थाळीच्या माध्यमातून भोजन घेतले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/04/pune-mhaiskar-750x375-1.jpg)
18 हजार 750 व्यक्तींची तरतूद असताना काल 19 हजार 534 नागरिकांनी भोजन घेतले असून थाळ्यांच्या संख्या मर्यादित असली तरी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जास्त नागरिकांनाही भोजन देण्यात येत असल्याचेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 3 हजार 955 मजूर कामावर
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 17 एप्रिल पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सोशल डिस्टेंसिंग ठेवून कामे सुरू करण्यात आली असून विभागात 987 कामे सुरू असून 3 हजार 955 मजूर काम करत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 61 हजार 35 कामांचे नियोजन करण्यात आले असून या माध्यमातून सव्वा कोटी मजूर क्षमता निर्माण होवू शकते.
त्यातून अनेक गरजूंच्या हाताला काम मिळू शकते असे सांगतानाच सोशल डिस्टेंसिंग महत्त्वाचे असल्याचेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.