शिर्डी, दि.28 : राज्यामध्ये लॉकडाऊन लागू केल्यानंतरही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी अनावश्यक गर्दी होत आहे.
हे अतिशय चिंताजनक आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संगमनेर येथील उपाययोजनांबाबत आढावा घेताना केले.
नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रकाश कलंत्री, प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्यासह विविध नगरसेवक व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मागील काही दिवसात संगमनेर शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रशासनाने हॉटस्पॉट जाहीर केलेल्या ठिकाणी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई त्याचप्रमाणे तालुक्यात व शहरामध्ये अधिकाधिकपणे प्रभावी ठरणाऱ्या उपाययोजनांसदर्भात मार्गदर्शन करुन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कोरोनाचे संकट आपल्या घरापर्यंत पोहोचले आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडण्याचे कटाक्षाने टाळावे, नागरिकांनी घरातच राहून स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबियांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी संगमनेर तालुक्यातील व शहरातील मजूरांसाठी करण्यात आलेली व्यवस्था त्याचप्रमाणे होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची माहिती मंत्रीमहोदयांनी घेतली.