फक्त दहा महिन्याचं बाळ… आज कोरोना मुक्त झालं… त्याला माहितही नसेल तो आज केवढं मोठं संकट लिलया पेलून सुखरूप बाहेर पडला… आई – वडिलांची हिम्मत धरून मागचे दोन आठवडे ज्या धीरोदत्तपणे काढले… त्यांच्या आनंदाला आज पारावार राहिला नसेल.
12 एप्रिलला 10 महिन्याचे बाळ पॉझिटिव्ह आल्याची बातमी आली.. त्यावेळी जिल्ह्याच्या मनात धस्स झालं… बाळ बरं व्हावं असे बरेच जण बोलून दाखवत होते.
कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स, सर्व आरोग्य कर्मचारी .. रुग्ण बरे व्हावेत म्हणून अपार कष्ट करत आहेत त्यांच्या प्रति जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवाच्या चित्रफितीत संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आहेच.
आज बाळ बाहेर पडलं हे ऐकून आजून लाखोंच्या सदिच्छा त्यांच्या व्यावसायिक कर्तव्य मूल्यात अजून भर घालतील… बाळ येतानाचं चित्र पाहताना आनंदाने डोळे भरून येतील असाच प्रसंग आहे तो.. 14 आणि 15 व्या दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि आज दिवशी तो कोरोनामुक्त झाल्याचे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी जाहीर केले… आज दहा महिन्याचं बाळ बाहेर येतं होतं… त्याच वेळी दुसरी एक आजी वय वर्षे 75 याही कोरोनाची जंग जिंकून बाहेर येत होत्या. एक दहा महिन्याचं बाळ आणि 75 वर्षाच्या आजी दोघांनीही या राज्याला मोठा धीर दिला…
आत्मविश्वासानं, संयमानं, दक्षता घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो… कोरोना विषाणू संसर्ग हा आपल्या संयमाची परीक्षा घेतो आहे… आपण घरात बसण्याचा संयम पाळू या… कोरोना दूर होईल. आजचे हे आश्वासक चित्र सातारकरांना आत्मबळ देणार आहे.
आज कृष्णा हॉस्पिटलमधून तीन रुग्ण कोरोना मुक्त होऊन बाहेर पडले एक 10 महिन्याचं बाळ, 75वर्षाच्या आजी आणि 28 वर्षाचे तरुण… !! तीन वेगवेगळ्या वयोगटांनी कोरोनाला हरवलं… इथून पुढेही याच धीरानं आणि घरात राहण्याच्या संयमाने लढत राहू… एक दिवस येणार कोरोनामुक्तीचा संदेश घेऊन… !!
या तिघांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी,
सातारा